माझ्या स्वप्नातील गाव

    माझ्या स्वप्नातील गाव

    बरेच दिवस झाले ब्लॉग लिहावा म्हणतेय, पण काही ना काही कारण काढून पुढे ढकलत होते. आता तुम्ही म्हणाल काय आळशी बाई आहे. पण प्रश्न हि तसाच होता. म्हणजे मी ब्लॉग लिहिला आणि त्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर? हाच विचार माझ्या मनात घोळत असायचा. त्यामुळे मी हा ब्लॉग किंवा हि पोस्ट टाकत नव्हते. पण आज शेवटी ठरवलंच कि लिहायचच. तसं बघता माझा विषय काही प्रक्षोभक नाही. मात्र विचार करायला लावणारा आहे. संवेदनशील हि आहे. 
     तर गोष्ट अशी आहे मित्रांनो, माझं जग हे काही तुमच्या जगापेक्षा निराळं नाही. पण माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा असू शकतो. 
     लहानपणा पासूनच एक विचार माझ्या मनात घर करून आहे, तो म्हणजे गाव किंवा खेडं. मित्रहो, प्रत्येकाला वाटत असतं आपण काहीतरी करावं, काहीतरी बनावं. प्रत्येकाच्या काही ना काही तरी महत्वाकांक्षा असतात. तश्याच माझ्याही होत्या. आहेत. लहानपणी म्हणजे मी पाचवीत असतांना वडिलांची कामानिमित्त बदली झाली, ते मुंबई ला गेले. आम्ही भावंडं शाळेत शिकत होतो. आणि शाळा अर्ध्यातुन सोडणं आम्हाला शक्य नव्हतं त्यामुळे वर्षभरानंतर आम्ही हि मुंबईला राहायला गेलो. त्या वेळेस गाव आणि शहर यातला फरक कळायचा नाही. तरीदेखील व्यक्तिशः मला मुंबई आवडली नाही. प्रश्न हा तिथल्या लोकांचा नाही पण तिथल्या जीवनपद्धतीचा आहे. खरे पाहता मुंबईतील लोक खूप वेगवान, खूप प्रगतिशील आणि तेव्हढेच दिलेर-दर्दी. पण लहानपणापासूनच माझी ओढ़ गावाकडे होती. शाळेत असताना कधी एकदा परीक्षा संपतील आणि सुट्ट्या लागतिल असं होत असे. मग काय सुट्ट्या लागल्या कि हमखास गावाकडे पळायचं. मग तिकडे आज्जी-आजोबा, मामा-मावशी सगळेच असायचे. तर सांगायचा मूळ मुद्दा असा कि जितके विकसित शहरं ज्यांना आपण आजकाल मेट्रो सिटीज म्हणतो, विकसित आहेत किंवा प्रगत आहेत तितकीच तेथील जीवनशैलीही वेगवान आहे. आणि तेव्हढीच तणावयुक्तही. 
     मित्रहो, लहाणपणी दूरदर्शन वर एक गाणं यायचं "स्वप्नामध्ये आम्ही पाहिला नवलाईचा गाव, वेशीवरती पाटी होती मोठयांना मज्जाव". तसा काही मला मोठ्यांना मज्जाव करायचा नाहीये. तर उलट मोठ्यांना सांगायचं आहे कि गावाकडे तुमचं स्वागत आहे. पण एव्हढंच आहे कि त्याचं शहरीकरण करण्याच्या नादात त्याचं मूळ स्वरूप बिघडवू नका. गावात जेव्हा मोठं-मोठे कारखाने किंवा उद्योग उभारले जातात ना तेव्हा खरंच दुःख होते. त्या कारखान्यातून निघणारा धूर, होणारे प्रदूषण यामुळे गावाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होते. खरच गावाचं शहरीकरण होत असताना पाहिलं ना कि वाईट वाटतं. मित्रहो, आपल्या पुरातन देशात गावे कशी होती, ती म्हणजे सर्वार्थाने स्वयंपूर्ण होती. त्या ठिकाणी पोट भरण्याकरता शेती पिकवली जात. दूध-दुभत्यांची समृद्धी होती. कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता. एव्हढेच नव्हे तर घरातले सामान बनविण्यासाठी सुतार, लोहार त्याचबरोबर गाडगी-मडकी बनविण्यासाठी कुंभार असत. मला एक मात्र आवर्जून सांगायचे आहे कि अश्या ह्या समाजात जाती वर अवलंबलेली व्यवस्था नको. जातीव्यवस्था नको. माणसाला माणसापासून दुरावणारे नियम नको. त्यापेक्षा माणसा मध्ये एकोपा निर्माण करणारे शिक्षण हवे. असे शिक्षण ज्या मुळे समाजाची जडणघडण होईल व उन्नती होईल. मग ते शिक्षण घेऊन कोणाला कुंभार व्हायचे असेल किंवा कोणाला लोहार व्हायचे असेल किंवा कोणाला आधुनिक शेती करायची असेल. आणि वेगवेगळे प्रयोग करून शास्त्रज्ञ होऊन ह्याच व्यवसायातून जीवनोपयोगी वस्तू (पण नैसर्गिकरित्या) बनवायच्या असतील, तर बनवू शकतो. अश्या ह्या प्रकारचे गाव आर्थिकरित्या देखील स्वयंपूर्ण असेल. म्हणजे गावातील युवकाला रोजगारासाठी बाहेर किंवा शहराकडे जाणे नको. गाव सर्व सोयीसुविधांनी सर्वार्थाने स्वयंपूर्ण असेल. ह्यालाच म्हणतात सर्वांगीण विकास. त्याचबरोबर गावाचे नैसर्गिक सौंदर्य जपले तिथला इतिहास जपला तर आपोआपच ते गाव एक उत्तम पर्यटन केंद्र म्हणूनही नावाजले जाईल. तर असे आहे माझ्या स्वप्नातील गाव. मंडळी तुम्ही देखील विचार करा. आणि मला सांगा कसा वाटला हा आदर्श गाव?         
 

Comments

Popular posts from this blog

कळी

दिवसाची प्रतिक्षा

दिपदान उत्सव ( दिपदानोत्सव ) --- Dipadaan Utsav (Dipdanotsav)